टर्निंग पॉईंट:
- Prantik Panigrahi
- 5 days ago
- 5 min read

Winning Story of TattvaKatha™ Story Writing Contest in Marathi Language Category - Written by Prakash Gheware - Pune
आठवण...(घुटमळ)
आजकाल का कोणास ठाऊक, पण भरलेल्या या घरांत माझ्याशी कोणी पहिल्यासारखे बोलतं नाही, जवळ येऊन घटकाभर बसतं नाही.. गरजेपुरता मोजकेच काय ते शब्द... या उतरत्या वयात आपणाशी कोणी का म्हणून बोलत बसावे बरं?...असे ही वाटून जाते कधी कधी.. मुलगा आणि सून दोघेही नोकरी करणारे,.. सौभाग्यवती असते दिवसभर दोघा नातवंडा सोबत,.. मी वगळता घरातले सगळेच आपापल्या कामात मग्न.... तसे पाहता, या उतरत्या वयात परमेश्वर कृपेने सगळ्या सुखसोई मिळाल्या आहेत मला... मुलाने घेतलेल्या या प्रशस्त" थ्री bhk" फ्लॅट मधे हवेशीर स्वतंत्र खोली आहे आम्हा उभयंतासाठी ,.. भिंतीवर लावलेला AC. स्वतंत्र फ्रिज, स्वतंत्र टीव्ही, कपाट सगळ कसं जिथल्या तिथे, एव्हढ सगळं असून देखील अंथरुणावर पडल्या पडल्या उगाचच वाटत रहात सारखं की,सगळ्यांचा संवाद कमी झालाय आपल्याशी .....
सौ. आणि मी बसलो होतो आमच्या खोलीत,BP ची गोळी माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली "औषधी तर वेळेवर घेत जा स्वतः आठवण ठेऊन? त्यासाठी देखील माझीच वाट पहात बसता तुम्ही, तरी बरं सगळं कसं वेळेवर आणि जिथल्या तिथे मिळतंय तुम्हाला,.. त्याच वेळी तिच्या मोबाईलची रिंग वाजली, पटकन् उचलला तिने तो, माझेही लक्ष गेले, माझ्या मोठ्या मुलीचा फोटो दिसला होता मला मोबाईलवर, माझ्याशी एकही शब्द न बोलता पटकन् मोबाईल घेऊन पलीकडच्या गॅलरीत पळाली होती ती,.. आणि अगदी हळु आवाजात संभाषण सुरू होते तिचे, त्यांचे संभाषण माझ्या कानावर पडूं नये हाच त्या मागील उद्देश, लक्षात आले होते माझ्या ते... जवळपास अर्धा तास त्यांचे संभाषण सुरू होते, त्यानंतर जेंव्हा पुन्हा माझ्या जवळ येऊन बसली तेव्हा मी तिला विचारले होते,..."कोणाचा फोन होता ग "?
"शेजारच्या नलिनी वहिनींचा "... ती.
"खोट बोलतेय तू? आपल्या"सोनू"चा फोटो दिसला मला... मी
"काही तरीच काय? वय झालंय तुमच.. सत्तरी उलटतेय तुमची... म्हणे "सोनू "चा फोटो?.. येते कुकर गॅस वर ठेऊन, असे म्हणतं ती निघून गेली होती. मला संभ्रमात टाकून, आपल्या पासून काही लपवले जात आहे याची जाणीव झाली होती मला...
. दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला, नातवांनी पळत जाऊन दार उघडल्याचे ध्यानी आलं, मुलगा आणि सून ड्युटी संपवून आले होते... माझ्या खोलीतून घराचा मुख्य दरवाजा दिसत नसला तरी आवाजावरून अंदाज लावता येत होता...
"आला होता का फोन"? सुनबाई विचारत होती.
"हो,.. आत्ताच थोड्या वेळा पूर्वी".. सौ. त्या नंतर अत्यंत हळु आवाजात त्यांचे संभाषण.. , मी हळूच अंथरुणावरुन उठलो, माझी चाहूल लागताच अचानक शांतता पसरली, मुलगा आणि सून दोघेही त्यांच्या रूममध्ये निघून गेले.
"मला आलेलं पाहून तुम्ही संभाषण का बंद केलं गं"? तेव्हा ती म्हणाली होती,.."काही विशेष असे काही नाही हो, ऑफिस मधली गंमत सांगत होता तो,".... सोफ्यावर अगदी तिच्या जवळ बसून मी तिच्या कानात पुटपुटलो,"वयस्कर झालो असलो तरी, कान आणि डोकं व्यवस्थित आहे अजून माझं, मूर्ख समजत आहात का मला तुम्ही?..... त्यावर हसत हसत ती म्हणाली होती,.. तुम्ही?.. आणि मूर्ख?.. ते कसं शक्य होईल? इतरांना मूर्ख बनवाल तुम्ही.... माझ्या डोक्यावर लाडाने हसत हसत"टप्पू"मारून स्वयंपाक घरांत ती निघून गेली होती ती...
"काय भानगड असावी बरं? सस्पेन्स वाढला होता... मी पुन्हा माझ्या खोलीत येऊन अंथरुणावर आडवा झालो होतो, डोक्यात विचारचक्र सुरू होतेच .. घरांत बाप वयस्कर/म्हातारा झाला की, पोटची मुल देखील त्याच्याशी संवाद का कमी करीत असावी बरं? बायकांचं बरं असत त्या बाबतीत,... त्या होतात ऍडजस्ट सगळ्यात पटकन्, आणि तरुणपिढी देखील घेते सामाऊन घेते बायकांना आपल्यात, बापाला मात्र ते बहुदा जमत नाही, जनरेशन गॅप तयार होतो त्यांच्या बाबतीत, मोकळ्या मनाने क्वचितच संभाषण होत असते बापाशी.....
टेबलावर जेवणाचे ताट ठेवून सौ. म्हणाली,"घ्या ही खिचडी गरम गरम खाऊन, गोळ्या घ्यायच्या आहेत नंतर,.. पाणी आणते मी...
"तू देखील बैस ना इथेच जेवायला, माझ्या सोबत?... मी.
"पोरांना वाढून येते मी, तुम्ही घ्या जेऊन पटकन्".. सौ.
माझे जेवण संपत आले होते तरी सौ. आली नव्हतीच, आली तेव्हा तिचा फोन किणकिणला होता, मी फोन उचलणार तितक्यात झडप मारल्यागत तिने तो पटकन् उचलला, आणि म्हणाली,"हो हो, मीच बोलते आहे,.. ह्यांचे जेवण सुरू आहे, समोरच आहेत ते...
"समजले, समजले.. सकाळी करतो फोन मी "आणि फोन बंद झाला...
"लहान जावई बोलतं होता ना गं?...मी.
"हो"... सौ.
"माझ्या समोर बोलण्याचे टाळले त्याने मुद्दाम, होय ना"?
"नाही हो, तसं काही नाही,. जेवतांना ऊगाच डिस्टर्ब नको, म्हणून बहुदा..... आता मात्र माझा संयम सुटू लागला होता..
घरातले सगळं आवरून जेंव्हा सौ. परत आली आणि झोपण्याची तयारी करू लागली तेंव्हा जरा घुश्यातच मी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला होता.."तुम्ही सगळे माझ्या पासून काय लपविण्याचा प्रयत्न करीत आहात?.. चोरून लपून कुजबुज करीत काय संभाषण सुरू असते तुमचे? मला काहीच कळू द्यायचं नाही का? दोन चार दिवसांपासून रोज बघतोय सगळेजण एकमेकांशी गुलुगुलु बोलत असतात, मूर्ख समजत आहात का मला? इकडे माझ्याकडे बघ,? सौ. चा चेहरा जरा घुश्यातच हाताने माझ्याकडे वळविला, आणि म्हणालो होतो,"माझी शपथ आहे तुला? काय लपवीत आहात माझ्यापासून सगळं सगळं सांग मला "..
सौ. ने उठून खोलीचा दरवाजा बंद केला, जवळ येऊन हळु आवाजात म्हणाली,"मुलांनी ताकीद दिली आहे मला न बोलण्याची, म्हणून गप्प आहे मी, अजून एक दोन दिवस थांबा, तेच सांगतील सगळं सगळं, तुमच्या साठी मोठं "सरप्राइज "असेल ते.. मी आधीच सांगितले आणि मुलांना कळाले तर म्हणतील,"मम्मा ने सगळा"पचका "करून टाकला ...
"अगं, तू बिनधास्त होऊन सांग सगळं, मी माझे तोंड गप्प ठेवेल, त्याची काळजी करू नको, सांग पटकन्, ऐकण्यास अधीर झालोय मी."
सौ. अगदी माझ्या जवळ येऊन बसली आणि हळू आवाजात सांगू लागली म्हणाली,"येत्या १८तारखेला तुमचा वाढदिवस आहे ना? ते तरी आहे ना लक्षांत तुमच्या"?
"अरे, हो की,.. तो तर दर वर्षी येतो"
"७१वी साजरी करायची ठरविली आहे तुमची सगळ्यांनी, दोघी मुली, दोघे जावई, मुलगा, सून सगळ्यांनीच"सरप्राईज "द्यायचं ठरविले आहे तुम्हाला, मोठ्या प्रमाणात ७१वी साजरी होणार आहे, त्यासाठी सगळे ड्युटी सांभाळून तयारीला लागले आहेत, नवग्रह शांती, आयुष्यवर्धनासाठी होम वगैरे विधी, त्याच प्रमाणे" साखरतुला "... आपल्या नंदू गुरुजींशी त्या बद्दल व्यवस्थित बोलणे झाले आहे, पूजेचे सगळे साहित्य त्यांनाच आणावयास सांगितले आहे. साखरतुला करण्यासाठी मोठा वजनकाटा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, माझ्यासाठी पैठणी साडी, तुमच्यासाठी सिल्क चांपायजमा कुर्ता, येवल्याहून ऑनलाइन मागवला आहे, बहुदा उद्या पार्सल येईलही कदाचित, त्याशिवाय नातेवाईकांना आठवण म्हणून "चांदीचे नाणे"देण्याचे ठरले आहे, बाबूभाई ज्वेलर्स कडे ऑर्डर दिली आहे... मुले हौसेने करीत आहेत तेव्हां गप्प रहा दोन तीन दिवस... तुम्हाला सगळं माहीत झालंय असं मुळीच भासू देऊ नका त्यांना, आलं ना ध्यानात?
तिचे ते बोलणे ऐकत असतांना मनांत विचार येत होते की, किती चुकीचा विचार करीत होतो आपण, की मुलांचे आपल्याकडे लक्ष नाही, ते आपल्याशी मनमोकळे बोलत नाहीत, आपल्या जवळ येऊन बसत नाहीत, जनरेशन गॅप झालाय, वगैरे वगैरे.... खरे पाहता आजकालची बहुतांश तरुणपिढी आपापल्या कामात व्यस्त असून देखील योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहेत, याला काही अपवाद असतीलही कदाचित आणि आहेत देखील, पण त्या बाबतीत आपण नक्कीच नशीबवान आहोत बहुदा, याच" हायस "वाटतं होत मला... मनांत असे आनंदी विचार सुरू असतांनाच माझी नजर समोरच्या कपाटाच्या "शोकेस "मध्ये ठेवलेल्या माझ्या आई वडिलांच्या फोटोकडे वळली होती आणि अपराधी पणाची भावना माझ्या मनांत तीव्रतेने जागृत झाली होती , आर्थिक परिस्थिती जेमतेम असून देखील, आम्हा भावंडांना आपापल्या पायावर उभे करतांना आई वडिलांनी सोसलेले कष्ट , आमच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करतांना त्यांची झालेली दमछाक, उधार उसनवार करून साजरे केलेले कुळधर्म कुळाचार, सगळं सगळं एखाद्या चलचित्रा प्रमाणे सरकू लागले होते माझ्या डोळ्या समोरून, आम्ही तिघे भाऊ नोकरीला लागलो होतो तरी देखील त्यांनी आमच्या कडून कशाची अपेक्षा केली नव्हती, ते मात्र कष्ट करतच राहिले शेवट पर्यंत, लग्नानंतर आम्ही तिघेही भाऊ वेगळे झालोआणी आमच्या संसारात मग्न झालो, सणावाराला एकत्र जमत असू तेंव्हाच काय ते त्यांच्याशी बोलणे होत असे, प्रथम पासूनच त्यांचा स्वभाव थोडा रागीट असल्याने, त्यांच्याशी बोलणे कमीच असायचे , त्या दोघांनाही त्यांच्या ७०ते ७२वय असताना देवाज्ञा झाली, खरं पाहता ते त्यांच्या जाण्याचे वय नव्हतेच, असे आज प्रत्यक्षपणे जाणवते, त्यांची काळजी घेण्यात आपण नक्कीच कमी पडलो आहोत या बद्दलची खंत मनांत घर करून आहे, आज या घडीला असेही वाटते की, त्यांच्या औषधोपचार आणि आयुष्य वर्धनासाठी , मोठा मुलगा या नात्याने मी पुढाकार घ्यायला हवा होता, आईबाप जिवंत असतांना त्यांना काहीसे दुर्लक्षित करणे, त्यांच्या गरजा लक्षांत न घेणे आणि ते सोडून गेल्यावर मात्र त्यांचे गुणगान सोशल मीडियावर करण्याची आजकालची पद्धत, ही आजकालची पद्धत नसून आधीच्या पिढीतही बहुतांश जणांकडून तेच घडले आहे, हे मान्य करायलाच हवे, अशा विचारांनी मन खरेच दुःखी झाले होते, मोठ्या हिंमतीने मी पुन्हा एकवार आईवडिलांच्या फोटो कडे नजर वळविली, दोघांचे चेहरे हसतच माझ्याकडे पहात होते, शेवटी आईबापच ना ते..?. माझ्या मनाची घालमेल, अपराधी भावना, होत असलेला पश्चात्ताप ओळखला असावा त्यांनी, आणि विशाल अंतःकरणाने हसऱ्या चेहऱ्याने,"शांत हो, वाईट वाटून घेऊ नकोस, आम्ही सदैव पाठीशी उभे आहोत, असाच आशीर्वाद दिला असावा त्यांनी .... आत्मिक शांतता मिळविण्यासाठी मी, मनोमन माझा माथा त्यांच्या चरणी ठेवण्या व्यतिरिक्त शेवटी दुसरे काय करू शकणार होतो, पुनश्च एकवार अपराधी नजरेने मी फोटोकडे नजर टाकली, आणि कुस बदलून झोपी गेलो होतो.
Prakash Gheware





Comments